सातारा : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने आणि विद्यमान संचालक मंडळाने हजारो कामगारांच्या घामाचा पैसा रोखून धरल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी संचालक प्रवीण बाबर यांनी केला आहे. याप्रकरणी कारखान्याच्या व्यवस्थापनावर व संचालक मंडळावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सातारा येथील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाबर यांनी म्हटले आहे की, किसन वीर कारखान्यातील कामगारांना तब्बल ३९ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. गेल्या १० वर्षांपासून हंगामी (सीझनल) कामगारांचा हक्काचा रिटेन्शन बोनस व्यवस्थापनाने गिळंकृत केला आहे. प्रॉव्हिडंट फंडाची रकमेवरील दंड आणि व्याज न भरल्यामुळे निवृत्त झालेले कामगार आज हक्कांच्या पैशांपासून वंचित आहेत. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या या आर्थिक शोषणाविरुद्ध आरपारची लढाई लढण्याचा निर्धार भूमिपुत्र संघटनेने केला असून, ८ दिवसांत कारवाई न झाल्यास सातारा कामगार आयुक्त कार्यालय आणि कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.


















