अहिल्यानगर : ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील आणि चंद्रशेखर घुले-पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे आहे. यंदाच्या निवडणुकीत ते नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार की पुन्हा जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यांवर विश्वास ठेवणार, याची उत्सुकता आहे. छाननी प्रक्रियेत काही मातब्बर इच्छुकांचे अर्ज बाद ठरल्याने कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘ज्ञानेश्वर’ ची ही निवडणूक केवळ संचालक मंडळाची निवडणूक नसून तालुक्यातील राजकीय ताकद आणि नेतृत्वाचीही मोठी परीक्षा मानली जात आहे. इच्छुकांनी संधी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारी माघारीचा दिवस कारखान्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. कारखान्याच्या २१ जागांमध्ये शेवगाव गट ३, शहर टाकळी ३. कुकाणा ३, नेवासा २, वडाळा २, ढोर जळगाव २, उत्पादक सहकारी संस्था १, अनुसूचित जाती-जमाती १, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ आणि विमुक्त भटक्या जाती-जमाती १ अशा जागांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाकडून कोणाला उमेदवारीची संधी मिळते कार्यकत्यांसह सभासदांचे लक्ष लागले आहे. सत्तारुढ गटाकडून कोणाला संधी द्यायची याची रणनीती आखली जात असल्याचे समजते. आगामी दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


















