पुणे : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित निवडणुकीबाबत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ४० लाख रुपयांची रक्कम अद्याप भरली नसल्याने निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी दी काँग्रेस (अजित पवार) च्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नागवडे यांनी केला आहे. या आरोपामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या की, मुंबई उच्च न्यायालयाने साईप्रिया शुगर प्रा. लि. कंपनीला १७ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रियेसाठी ४० लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही ही रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भीमा पाटस कारखान्याची निवडणूक घेण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा संशय बळावत आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांपैकी २० लाख रुपये कारखान्याकडून भरले गेले असून, उर्वरित ४० लाख रुपये साईप्रिया शुगरने भाडेकराराच्या अटींनुसार जमा करावेत, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप ती रक्कम जमा न झाल्याने निवडणूक प्रक्रियेला खीळ बसल्याचे सांगितले जात आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार रमेश थोरात, जयशिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे, दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गुरुमुख नारंग आणि तालुकाध्यक्ष नितीन दोरगे उपस्थित होते.


















