सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम १५ जून २०२६ रोजी अधिकृतपणे संपला, अंतिम अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी (१० सहकारी व ६ खासगी) ७९.७४ लाख टन उसाचे गाळप करत ८५.४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्याचा सरासरी निव्वळ साखर उतारा १०.७१ टक्के इतका नोंदविला गेला. यंदाच्या हंगामातही राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विविध शाखांनी जिल्ह्यात वर्चस्व राखले आहे. वाटेगाव-सुरूल शाखेने सर्वाधिक १३.७० लाख टन उसाचे गाळप केले. १५.५५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. त्यानंतर कडेगाव तालुक्यातील सोनहिरा कारखान्याने ९.७३ लाख टन उसाचे गाळप करत ११.२२ लाख क्विंटल साखर उत्पादित केली.
सांगली जिल्हा समाविष्ट असलेल्या संपूर्ण कोल्हापूर विभागाचा विचार केल्यास, यंदा या विभागाने २१०.४९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करून राज्यात अव्वल स्थान मिळविले. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा एकूण १०४५.६१ लाख क्विंटल साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे, जे मागील हंगामाच्या (८०९.४९ लाख क्विंटल) तुलनेत अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या विभागांचा साखर उत्पादनात दबदबा राहिला आहे. साखर उत्पादन आणि ऊस उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल ठरला असून कोल्हापूर विभागातील ३९ कारखान्यांनी २३१.९२ लाख टन उसाचे गाळप केले. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा राज्यात उच्चांकी ११.०२ टक्के इतका आहे.


















