कोल्हापूर : ‘द उगार शुगर वर्क्स लिमिटेड’ उद्योग समूहाचे माजी चेअरमन आणि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र विनायकराव उर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे गुरुवारी निधन झाले. कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातील एक अग्रगण्य उद्योजक आणि साखर कारखानदार म्हणून ते देशात परिचित होते. त्यांनी साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादनात मोठे योगदान दिले आहे. ‘डेक्कन शुगर’च्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.
राजाभाऊ शिरगावकर यांना त्यांच्या सामाजिक आणि औद्योगिक कार्यासाठी कोल्हापूरसह देशभरातील विविध संस्थांद्वारे विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१८ मध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (केसीसीआय) ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ उद्योगपती राजाभाऊ शिरगावकर यांना ‘शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार’ देण्यात आला. त्याच्यावतीने हा पुरस्कार सचिन आणि सोहन शिरगावकर यांनी स्वीकारला होता. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तसेच लायन्स क्लबतर्फे त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.


















