इथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रमाणितच असल्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा दावा, सोशल मीडियावरील दावे भ्रामक

नवी दिल्ली : इंधनात मिसळण्यासाठी वापरले जाणारे इथेनॉल हे प्रस्थापित औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते आणि पेट्रोलमध्ये मिसळण्यापूर्वी ते कठोर गुणवत्ता मानकांची पूर्तता करते. इथेनॉल हे उसाचा रस, मळी, तांदूळ आणि मका यांसारख्या विविध कच्च्या मालापासून बनवले जाते; परंतु इथेनॉलचे गुणधर्म हे मूळ कच्च्या मालापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. कारण निर्मिती प्रक्रियेदरम्यान त्याला किण्वन (फर्मेटेशन) प्रक्रियेसह अनेक टप्प्यांतून जावे लागते, अशी माहिती देत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (ईबीपी) हा वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित असून केंद्र सरकारने त्यावर देखरेख ठेवली आहे. ईबीपीबाबत सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती चुकीची असल्याचे आणि इतर कथित दावे भ्रामक असल्याचे मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन देशाला परकीय चलनाच्या स्वरूपात १.४ लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्यास मदत झाली असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की, ईबीपी कार्यक्रमामुळे इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी-आधारित कच्च्या मालाची शाश्वत मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा जुने फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. जनतेमध्ये अनावश्यक चिंता आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी असे केले जात आहे. जगभरातील अमेरिका, ब्राझील व जपानसह अनेक देशांमध्ये ईबीपीची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे. ब्राझीलने बऱ्याच काळापासून इथेनॉल मिश्रणाचे उच्च प्रमाण स्वीकारले असून, तिथे ई-२ हे पेट्रोल मिश्रणाचे मानक आहे. कच्च्या तेलाची आयात कमी करणे, ऊर्जा सुरक्षा वाढविणे आणि पर्यावरणीय शाश्वततेला चालना देणे या उद्देशांसह २००३ मध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel

२०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (ई-२०) धोरण लागू करण्यात आले आहे. ई-२० पेट्रोल सुरू झाल्यापासून, इथेनॉल मिश्रणामुळे इंजिन निकामी होणे किंवा वाहन बंद पडणे अशा कोणत्याही मोठ्या समस्यांची नोंद झालेली नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या पसरवला जाणारा एक दावा इथेनॉलच्या आर्द्रता शोषून घेण्याच्या (हायग्रोस्कोपिक) गुणधर्माशी संबंधित आहे. इंधन टाकीमध्ये पाणी जाणे हे कोणत्याही प्रकारच्या इंधनासाठी अस्वीकार्य असते. आधुनिक वाहनांमध्ये इंधन टाकीमध्ये पाणी जाण्यापासून रोखण्यासाठी विशिष्ट रचना आणि सुरक्षा उपाययोजना असतात असे मंत्रालयाने म्हटले आहे. सोशल मीडियावर वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या असल्याचे दर्शविणारा एक व्हिडिओ फिरत होता. याबाबत बीपीसीएलने इथेनॉल तयार करताना अंतिम उत्पादनातील उरलेली साखर पूर्णपणे काढून टाकली जाते असे स्पष्ट केले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here