कोल्हापूर : प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या संकटावर उपाय शोधत ‘नंबीकुर्मा बायोप्लास्ट’ ही संकल्पना कोल्हापूरच्या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी. टेकच्या संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण विषयाचा विद्यार्थी वरद विजय बक्षी याने विकसित केली. या प्रकल्पाने एमएसएमई आयडिया हॅकाथॉन ५.० मध्ये देशभरातून आलेल्या ५२ हजारांहून अधिक संकल्पनांमधून अव्वल ५०२ मध्ये स्थान मिळवले. ‘पिच पल्स २०२६’ या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर ‘इन्व्हेंटो र के २६’ आयडियाथॉनमध्ये द्वितीय उपविजेतेपद मिळवत या संकल्पनेने आपली क्षमता सिद्ध केली आहे. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना ऊस, उपउत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. तो सध्या अंतिम वर्षात शिकत आहे.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ऊस-मळीपासून कमी खर्चात पॉलिलॅक्टिक अॅसिड आधारित बायोप्लास्टिक तयार करण्याचा प्रयत्न. ही प्रक्रिया शून्य कचरा, कमी कार्बन उत्सर्जन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नियंत्रण प्रणालीचा वापर करते. यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यासह पर्यावरणीय परिणामही कमी होऊ शकतात. वरदने ऊस, उपउत्पादनांपासून जैवविघटनशील प्लास्टिक निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे. प्राचार्य डॉ. विजय घोरपडे, कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शगुप्ता मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प विकसित झाला. प्रकल्पासाठी इ अॅण्ड टीसीचा विद्यार्थी प्रज्वल जाधव याने सहकार्य केले. १२.७५ लाख रुपयांच्या सरकारी अनुदानाच्या साहाय्यातून प्रत्यक्ष उत्पादन केले जात आहे.
दैनिक ‘लोकमत’शी बोलताना संशोधक विद्यार्थी वरद बक्षी म्हणाला कि, इस्रोचे शास्त्रज्ञ नंबीनारायण यांना हा प्रकल्प समर्पित केला आहे. ‘नंबी’ म्हणजे तमिळमध्ये विश्वासार्हता आणि ‘कुर्मा’ म्हणजे भगवान विष्णूंचा कासव अवतार. समुद्री परिसंस्था स्वच्छ ठेवण्यात कासवाची भूमिका जशी महत्त्वाची, त्याचप्रमाणे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ही संकल्पना योगदान देईल.


















