कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक वाहतूकदार शेतकरी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलले उपोषण स्थगित केले. उपोषणकर्ते व ऊस वाहतूकदार प्रतिनिधींसोबत २४ जूनला बैठक घेऊन विविध मुद्यांवर चर्चा झाली. ऊस वाहतूकदारांनी केलेल्या मागण्यांपैकी आठ मागण्या मान्य झाल्याने पाटील यांनी उपोषण मागे घेतले. प्रादेशिक सहसंचालकांना (साखर) अपर जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी पाठविलेल्या पत्रात ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांबाबत संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे नमूद केले आहे. उर्वरित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी (ता. २९) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.
दरम्यान, ऊस वाहतुकदारांनी केलेल्या काही मागण्या सहकार विभागाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्याने त्या साखर आयुक्तांना पाठविल्याचे स्पष्ट केले आहे. कारखानदारांकडून ऊस वाहतूकदारांची वाहने अनधिकृतपणे अडवून ठेवण्याच्या तक्रारीवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. याबाबत साखर कारखान्यांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अनधिकृत व बेकायदेशीररित्या वाहतूकदारांची वाहने जप्त करून प्रदीर्घ काळ ताब्यात ठेवू नयेत, अशा सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. दरम्यान, राजगोंडा पाटील यांनी आठ मागण्या मान्य झाल्याने पाटील यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. उर्वरित मागण्या झाल्या तर ठीक, अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिला.


















