सोलापूर : गेल्या दोन वर्षातील थकीत ऊस बिले मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्यावतीने सोमवारपासून कारखाना स्थळावर थकीत ऊस बिलाच्या रकमांचे धनादेश वितरित करण्यास सुरुवात झाली. कारखान्याच्या यादीनुसार पहिल्या दिवशी, सोमवारी दहिटणे (अक्कलकोट), दर्गणहळळी, दर्शनाळ, देवशिंगा, अरबळी, दहिटणा (तुळजापूर) या सहा गावातील शेतकऱ्यांना सन २०२५-२६ मध्ये पुरवठा केलेल्या ऊस बिलांच्या रकमांचे धनादेश देण्यात आले. आता आज, मंगळवारी गुजनुर, गुळहल्ली, हत्तीकणबस, हिप्परगा, होर्टी ईटकळ जळकोट जहांगीर होटगी इब्राहिमपूर हगलूर हलहळी, हंगरगा, हांजगी, लोहगाव, मद्रे, मैंदर्गी, माळेगाव, मार्डी या १९ गावातील शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येणार आहेत.
पहिल्या दिवशी ६ गावातील १९९ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. ‘एनसीएलटी’च्या मध्यस्थीने ओंकार शुगर ग्रुपच्यावतीने कारखान्याने निश्चित केलेल्या गावांच्या यादीनुसार शेतकऱ्यांना वारणा सहकारी बँकेचे धनादेश देण्यात आले आहेत. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते आणि शेतकरी नेते अॅड. अमोल पाटील, अरविंद घोडके, बाळासाहेब मोरे, माणिक मोकाशी, बसवराज नरे, कार्तिक पाटील आणि ओंकार शुगर ग्रुपचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी गोकुळ शुगर प्रशासनाने सांगितले की, गेल्या दोन हंगामात ऊस पुरवठा केलेल्या २८०० शेतकऱ्यांच्या रकमा थकीत आहेत. धनादेश वितरणप्रसंगी शेतकरी नेते अॅड. अमोल पाटील म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला. कारखान्याने केलेली यादी आम्ही मान्य केली. समझोत्याचा मार्ग अवलंबला. आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, तहसीलदार किरण जमदाडे यांनी नियमाला मुरड घालून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.


















