वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, १८ हजार एकर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने मिल-रोलरचे पूजन केले असून ओव्हरलायनिंग व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. मागील हंगामातील सर्व बिले, कमिशन व डिपॉझिटची रक्कम वाहतूकदारांना वेळेत अदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन हंगामासाठी कारखान्याशी तोडणी वाहतुकीचा करार केलेल्या मुकादमांना उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालक मंडळाच्या हस्ते धनादेश देण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम आदी यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले की, आगामी हंगामामध्ये प्रतिदिन ८ हजारापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे. १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ योजना तयार करीत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनी ऊस आपल्या कारखान्यास गाळपासाठी पाठवावा. यावेळी ऊस तोडणी वाहतूक मुकादमांना पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करणारा आणि जिल्ह्यात तोडणी यंत्रणा उभारणीत आघाडी घेणारा हा पहिला कारखाना ठरल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, मुख्य व्यवस्थापक हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.


















