बेळगाव : कुप्पटगिरी येथील भाग्यलक्ष्मी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वरिष्ठतेच्या निकषांकडे दुर्लक्ष करून बाहेरील कामगारांची नियुक्ती केली जात आहे. सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेली वेतन तफावत देण्याबाबत चर्चा होऊन ७० टक्के रक्कम देण्याचे मान्य झाले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय कामगारांवर दबाव टाकण्यासाठी दुसऱ्या युनियनच्या माध्यमातून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष सुनील झुंजवाडकर यांनी केला. भाग्यलक्ष्मी एम्प्लॉईज युनियन’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या मागण्यांबाबत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, अध्यक्ष व आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याशी चर्चा झाली होती. वरिष्ठतेनुसार नियुक्त्या, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत आदा करणे, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि कारखान्यासाठी जमीन दिलेल्या कुटुंबांतील पात्र सदस्यांना कायमस्वरूपी रोजगार देणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, बेमुदत उपोषणही करण्यात येईल, असे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कारखान्यासाठी जमीन गेलेल्या कुटुंबांतील कामगारांना कायमस्वरूपी नोकरी न देता केवळ तीन महिन्यांसाठी कामावर घेतले जात असल्याचा मुद्दाही युनियनने उपस्थित केला आहे. दरम्यान, कामगारांवर कोणत्याही प्रकारे अन्याय केला नाही. हंगामी कामगारांना कायद्यानुसार हंगामाप्रमाणेच कामावर घेतले गेले आहे. वेतनाबाबत आणि इतर गोष्टींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा आंदोलनाचा पवित्रा उचलला जात आहे, असे लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील सांगितले.


















