नवी दिल्ली : भूतानने भारताकडून E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल आयात करण्याचा प्रस्ताव नाकारल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले आहे. सरकारने स्पष्ट केले की, तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) भूतानला असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच भूतानला E20 पेट्रोल निर्यात करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात नागरिकांना या विषयावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG) तसेच तेल विपणन कंपन्यांकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वी काही माध्यमांमध्ये भूतानने भारताकडून E20 पेट्रोल स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानुसार, भूतानमधील जुनी इंधन साठवण व्यवस्था आणि इथेनॉल मिश्रित इंधनामुळे विद्यमान वाहनांमध्ये सुसंगततेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. स्थानिक माध्यमांतील वृत्तांमध्ये भूतानच्या व्यापार विभागातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने असेही म्हटले होते की, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये आर्द्रता शोषून घेण्याचा गुणधर्म असल्याने इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
या अहवालात पुढे असा दावाही करण्यात आला होता की, डोंगराळ भागात वाहनांना अधिक शक्तीची आवश्यकता असते आणि अशा परिस्थितीत E20 पेट्रोल अपेक्षित कार्यक्षमता देऊ शकत नाही. त्यामुळे भूतानने E20 पेट्रोल आयात न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले होते.मात्र, केंद्र सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, भूतानला E20 पेट्रोल निर्यात करण्याचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यामुळे भूतानने असा प्रस्ताव नाकारल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

















