सातारा : ‘किसन वीर’मध्ये नव्या गळीत हंगामाची तयारी, मिल रोलर पूजन उत्साहात

सातारा : किसन वीर व किसन वीर-खंडाळा या कारखान्यांच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी तोडणी यंत्रणा सज्ज असून, ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी देऊन, किसन वीर कारखान्याचे सात लाख व खंडाळ्याचे चार लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीन पाटील यांनी केले. कारखाना वाचवण्याचे काम मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व आम्ही करत आहोत. आपण चांगल्या प्रतीचा ऊस देणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिल रोलर पूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार पाटील म्हणाले की, खंडाळा कारखान्याच्या सर्व बँकांचे ‘ओटीएस’ झाले असून, किसन वीर कारखान्याचे फक्त दोन बँकांचे ओटीएस बाकी आहे. तेही लवकरच होईल. सर्व कर्जे भागवल्यानंतर एक ते दीड वर्षात नेटवर्थ वाढून, बँकांकडून नियमित कर्ज मिळेल. किसन वीर कारखान्याचे ६५ हजार सभासद आहेत. प्रत्येक सभासदाने आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी पाठवल्यास कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास कसलीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. तर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी ना. मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे प्रश्न लवकरच सोडवले जाणार आहेत असे सांगितले. यावेळी संचालक बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशीला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, संचालक ज्ञानेश्वर भोसले, पंचायत समितीचे सभापती भैयासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here