सोलापूर : आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास तीव्र विरोध; सभासद, शेतकरी आणि कामगारांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप‎

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या मालकीचा असून तो सहकारी तत्त्वावरच चालवावा, या प्रमुख मागणीसाठी वांगी (ता. करमाळा) येथील उदयसिंह देशमुख यांनी ७ जुलैपासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. सध्या कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाच्या तयारीत आहे. मात्र, हा निर्णय घेताना सभासद, ऊस उत्पादक, कामगार आणि वाहतूकदार यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय सर्वसाधारण सभेत मांडून कारखाना सहकारी तत्त्वावरच चालविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

उपोषणकर्ते उदयसिंह देशमुख यांनी सांगितले की, सभासदांनी कारखाना सहकारी तत्त्वावर चालावा या विश्वासाने संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे तो खासगी संस्थेला किंवा भाडेतत्त्वावर देणे म्हणजे सभासदांच्या विश्वासाला तडा देण्यासारखे आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सुमारे ३३ हजार सभासद आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि सहकार मंत्र्यांनी सभासदांच्या हिताचा विचार करून कारखाना त्यांच्या मालकीचाच राहील, यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, जर विद्यमान संचालक मंडळाला कारखाना चालविणे शक्य नसेल, तर महाराष्ट्र शासनाने प्रशासकाची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत कारखाना सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले कि, उपोषणकर्ते उदयसिंह देशमुख यांनी मांडलेल्या मागण्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार आहे. तसेच १५ जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली असून, पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here