परभणी : गोदाकाठ ऑरगॅनिककडून सव्वाचार कोटी थकीत, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

परभणी : पाथरी तालुक्यातील गोदाकाठ ऑरगॅनिक कारखाना व्यवस्थापनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात रुपयाही जमा झालेला नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. २८१ शेतकऱ्यांचे तब्बल सव्वाचार कोटी रुपये थकले आहेत. गोदाकाठ ऑरगॅनिक कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस नेला होता, मात्र शेतकऱ्यांना उसाची रक्कम मिळाली नाही. यासाठी शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून कारखाना व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. प्रश्न सुटत नसल्याने २ जुलैपासून शेतकरी तहसीलसमोर उपोषणास बसले आहेत. यापूर्वीही निवेदने, बैठका आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊसबिलावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असते. खरीप हंगामातील पेरणी, खत-बियाणांची खरेदी, शेतीमजुरांचे पैसे, बँक कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च या सर्व गरजा या पैशांतून भागवल्या जातात. मात्र ऊसबिल रखडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने चर्चा करून लवकरच देयके अदा करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र सात दिवस उलटूनही कोणतीही ठोस घोषणा किंवा देयक वितरण सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. त्यामुळे आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची वेळ आता संपल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्या मार्फत कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनावर दबाव आणावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here