मुंबई : यंदा नैऋत्य मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास आगामी काही महिन्यांत भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने आपल्या ताज्या अहवालात दिला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटण्याबरोबरच महागाई वाढण्याची, ग्रामीण भागातील मागणी कमी होण्याची आणि कर्जवाढीचा वेग मंदावण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिल्यास शेती, कृषी रसायने (ॲग्रोकेमिकल्स), ट्रॅक्टर, दुचाकी उद्योग आणि मायक्रोफायनान्स क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर दुहेरी संकट…
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सच्या मते, भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था सध्या दोन मोठ्या आव्हानांना सामोरी जात आहे. एकीकडे नैऋत्य मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे जागतिक भू-राजकीय तणावामुळे कृषी निविष्ठांच्या (इनपुट) किमती वाढत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. अहवालात म्हटले आहे की, कमी पावसामुळे पीक उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ट्रॅक्टर, दुचाकी आणि ग्रामीण बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या इतर उत्पादनांच्या मागणीवरही होऊ शकतो.
जलविद्युत निर्मिती आणि सरकारी अर्थकारणावरही परिणाम…
अहवालानुसार, मान्सून कमकुवत राहिल्यास देशातील जलविद्युत निर्मितीत 10 ते 15 टक्क्यांची घट होऊ शकते. याशिवाय महागाई वाढणे, ग्रामीण भागातील ग्राहक खर्च कमी होणे आणि सरकारी अर्थकारणावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने म्हटले आहे की, कमकुवत मान्सूनचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरही दिसू शकतो. बँकांच्या कर्जवाटपाचा वेग कमी होण्याची आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कर्जांच्या गुणवत्तेत काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, बँकांच्या एकूण उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.दुसरीकडे, मायक्रोफायनान्स संस्थांना (एमएफआय) अधिक फटका बसू शकतो, कारण त्यांचा मोठा ग्राहकवर्ग ग्रामीण भागातील असून कर्जदारांची परतफेड क्षमता तुलनेने कमी असते.
भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम असल्याचा विश्वास…
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सच्या क्रेडिट विश्लेषक गीता चुघ यांनी सांगितले की, मायक्रोफायनान्स संस्था बँकांच्या तुलनेत अधिक जोखमीच्या स्थितीत आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित कर्जांच्या गुणवत्तेत काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असली, तरी देशात कृषीबाह्य क्षेत्रातील वाढ आणि मजबूत वित्तीय व्यवस्था व्यापक आर्थिक जोखीम कमी करण्यास मदत करेल.त्यांनी पुढे सांगितले की, विवेकपूर्ण कर्जवाटप आणि नियामक संस्थांची वेळेवर होणारी हस्तक्षेपात्मक भूमिका यामुळे मान्सून अपुरा राहिला तरी मोठ्या प्रमाणावरील पतजोखीम नियंत्रित ठेवता येईल.


















