नवी दिल्ली : देशात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमास २००१ मध्ये सुरुवात झाली होती. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. २०१४ पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे सरासरी प्रमाण दीड टक्क्यांच्या आसपास होते. मात्र २०१८ मध्ये जैव इंधनाबाबतचे राष्ट्रीय धोरण जाहीर झाल्यानंतर आणि उसाव्यतिरिक्त इतर कच्च्या मालाचा वापर वाढविण्यात आल्यानंतर सरकारने इथेनॉलच्या उत्पादनाला गती दिली. ई-२० इंधनामुळे वाहनाचे मायलेज तीन ते पाच टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मात्र या इंधनाचे फायदेच जास्त आहेत, असा दावा पेट्रोलियम मंत्रालयाने केला आहे. प्रत्यक्ष वापराच्या स्थितीत सर्व्हिसिंग केलेल्या वाहनांमध्ये ई-२० पेट्रोलमुळे गंज, असामान्य झीज किंवा अन्य घटकांच्या आयुर्मानाचे नुकसान झाल्याची तक्रार आघाडीच्या वाहन कंपन्यांनी नोंदवली नाही, असे सांगत मंत्रालयाने पेट्रोल पंपांवर ई-१० आदी प्रकारचे इंधन समानांतर प्रकारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता फेटाळली.
पेट्रोलियम मंत्रालयाने तपशीलवार निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. ई-२० इंधन पारंपारिक पेट्रोलपेक्षा स्वस्त असेल असे नाही. कारण शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी इथेनॉल खरेदीचे दर फायदेशीर पातळीवर निश्चित केले जातात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर तुलनेने कमी असताना हे दर पेट्रोलच्या किमतीपेक्षा जास्त असू शकतात, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ई-२० इंधनामुळे उच्च ऑक्टोन रेटिंग, इंजिनमधील ‘नॉकिंग’ रोखण्याची उत्तम क्षमता, जलद ज्वलन, अधिक चांगले पिकअप, वेग वाढवताना मिळणारा सहजपणा, इंजिनचे स्वच्छ कार्य तसेच वाहनाचे संपूर्ण जीवनचक्रातील कमी कार्बन उत्सर्जन आदी फायदे मिळू शकतात. ई-१० किंवा शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत ई-२० इंधन अधिक स्वच्छ, उच्च दर्जाचे आणि जास्त कार्यक्षम आहे. वैज्ञानिक चाचण्या, वाहन उत्पादकांशी चर्चा तसेच देशांतर्गत इथेनॉल उत्पादनातील वाढ यानंतर हे इंधन बाजारात आणले गेले आहे. देशाने नियोजित वेळेच्या आधी म्हणजे २०२२ मध्येच इथेनॉल मिश्रणाचे दहा टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर वर्ष २०२५-२६ मध्ये इथेनॉल मिश्रणाचा २० टक्क्यांचा टप्पा गाठला गेला. आता इंधनाची समांतर पुरवठा साखळी ठेवल्यास वाहतूक खर्च वाढेल आणि इंधन वितरण कार्य गुंतागुंतीचे बनेल,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.


















