कोल्हापूर : इथेनॉलमुळे वाहनांच्या इंजिनवर कोणताही परिणाम होत नसताना काही लोक जाणीवपूर्वक चुकीचा प्रसार करीत आहे. भारतीय किसान संघ हा शेतकऱ्यांसाठी संघटितपणे काम करणारा संघ असून, चांगले करणाऱ्याच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. साईरेड्डी यांनी केले. गडहिंग्लज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना उसासह भात, मका याला चांगला दर मिळाला असून, यापुढेही मिळणार आहे. भारताचे इंधनासाठीचे अन्य देशांवरील अवलंबित्व कमी होणार असून, देशाचा पैसा वाचणार आहे, असे ते म्हणाले.
साईरेड्डी म्हणाले, इथेनॉलमुळे साखर कारखान्यांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे व यापुढेही होणार आहे. मात्र इथेनॉलविरुद्ध जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट केला जात आहे. इथेनॉलमुळे इंजिन खराब झाल्याचे कुठेही घडले नसून, १०० टक्के इथेनॉलवर चालणारी इंजिने बाजारात आणली आहेत. अनेकांनी केवळ राजकीय दृष्टीकोनातून याकडे पाहिले असून, त्याऐवजी देशाच्या आर्थिकतेकडे व शेतकऱ्यांच्या फायद्याकडे बघितले तर इथेनॉलचे महत्त्व साऱ्यांनाच कळेल. भारतीय जनता पार्टी व भारतीय किसान संघ यांचे एकमेकांशी काही देणेघेणे नाही. याला केवळ चुकीच्या पद्धतीने राजकीयता जोडली जाते. इथेनॉलबाबतचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याने आम्ही त्याच्या समर्थनार्थ आहोत असे रेड्डी यांनी सांगितले.


















