नाशिक : सुटका केलेल्या मालेगावच्या ऊसतोड कामगारांचे पुनर्वसन करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

नाशिक : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका ट्रॅक्टरमालक व मुकादमाने डांबून ठेवलेल्या मालेगावचे तीन ऊसतोड कामगार पुरुष, तीन महिला व त्यांच्या सहा मुलांना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जनसाहस फाउंडेशनद्वारे ‘रेस्क्यू’ करण्यात आले होते. त्यांची बुधवारी (दि. १५) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दालनात भेट घेतली. यावेळी या कुटुंबीयांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्मदाखले, मतदार ओळखपत्र, आदी महत्त्वाची कागदपत्रे बनवून द्यावीत, तसेच आवास योजनेचा लाभ, आदी सोयीसुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश प्रसाद यांनी दिले.

मालेगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या ऊसतोड कामगारांसह जळगावमधीलसुद्धा काही ऊसतोड कामगारांची सुटका करण्यात यश आले आहे. तसेच पुण्यात संबंधित ठेकेदार व ट्रॅक्टरमालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जनसाहस फाउंडेशनमार्फत ऊसतोड कामगारांना त्यांच्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी यांच्यापुढे त्यांच्या दालनात सायंकाळी हजर करण्यात आले होते. यावेळी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण हेदेखील उपस्थित असल्याने प्रसाद यांनी तत्काळ त्यांना आदेशित करत, ऊसतोड कामगारांचे पुनर्वसन करत त्यांच्या मूळ गावी भेट देण्यास सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

तसेच मालेगाव तहसीलदार यांनाही संबंधित कामगारांचे सर्व महत्त्वाची शासकीय कागदपत्रे तयार करून घेत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच संबंधितांची बँक खाती उघडण्याची कार्यवाही सुरू असून बालकांच्या शाळाप्रवेशाची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह फाउंडेशनचे प्रतिनिधी जयपाल देवडा, बाळासाहेब शिंदे, अॅड. वीरसेन काजळे, सोनम बोन्हाडे, कपिल बोरसे, आदी उपस्थित होते.

सुटका करण्यात आलेल्या सर्व मजुरांना तातडीचा दिलासा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून कपडे, अन्नधान्य, पादत्राणे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे किट तत्काळ वाटप करण्यात आले. तसेच शासन निर्णयानुसार प्रतिव्यक्ती देय असलेली तातडीची सानुग्रह मदत रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात ऊसतोड मजूर व त्यांचे कुटुंबीय दाखल होताच प्रसाद यांनी त्यांच्या खुर्चीवरून उठून समोरील अभ्यागतांच्या खुर्चीवर बसून सर्व मजुरांसोबत संवाद साधून आस्थेने त्यांची विचारपूस करत दिलासा दिला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here