ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाची हाक; नव्या त्रिपक्षीय कराराची मागणी

अहिल्यानगर : ऊसतोडणी व ऊस वाहतूक कामगार तसेच मुकादमांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर वाहतूक संघटनेने राज्यव्यापी संपाची नोटीस दिली आहे. ऊसतोड कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. नव्याने त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांचा आगामी गळीत हंगाम सुरू करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेचे नेते संजय कीर्तने यांनी दिला.

राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगार तसेच मुकादमांच्या सेवा-सुविधांबाबत २७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. या कराराची मुदत तीन वर्षांची होती. २०२५-२६ च्या गळीत हंगामात या कराराची मुदत संपली आहे. आता २०२६-२७ चा गळीत हंगाम २७ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करून नवा त्रिपक्षीय करार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

मुख्यमंत्र्यांसह साखर आयुक्तांनाही संपाची नोटीस

संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, समाजकल्याण आयुक्त तसेच साखर संघाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना संपाची नोटीस दिली आहे.नव्या त्रिपक्षीय करारासाठी शासन, साखर उद्योग आणि कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींची त्रिसदस्य समिती स्थापन करून ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. कामगारांच्या मजुरीत ५० टक्के वाढ करण्यासह एकूण १६ मागण्या शासन आणि साखर उद्योगासमोर मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन नव्याने त्रिपक्षीय करार होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका संजय कीर्तने यांनी मांडली.

ऊसतोड कामगारांच्या प्रमुख मागण्या

  • ऊसतोड कामगारांना प्रतिटन ६०० रुपये मजुरीची हमी द्यावी.
  • वाढलेले डिझेलचे दर तसेच वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च लक्षात घेऊन ऊस वाहतूक दरात १०० टक्के वाढ करावी.
  • मुकादमांच्या कमिशनमध्ये ३५ टक्के वाढ करावी.
  • सर्व ऊसतोड कामगारांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून त्यांना ओळखपत्र व सेवापुस्तिका देण्यात यावी.
  • शासन निर्णयानुसार गाळप झालेल्या उसामागे प्रतिटन १० रुपयांप्रमाणे मागील तीन वर्षांचा निधी संबंधित साखर
  • कारखान्यांनी कामगार कल्याण महामंडळाकडे जमा करावा.
  • ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू कराव्यात.
  • ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात यावी.
  • ऊसतोड कामगारांना प्रॉव्हिडंट फंडाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
  • ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करावी.

‘करार करा, मगच गाळप सुरू करा’

गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच कामगारांच्या मागण्यांवर शासन आणि साखर उद्योगाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेची भूमिका आहे. मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम रोखण्याचा इशारा संघटनेने दिल्याने आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवा त्रिपक्षीय करार होऊन कामगारांच्या मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here