साखर उद्योगात ऊसतोड मजुरांचे मोलाचे योगदान : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : साखर उद्योगाच्या प्रगतीमध्ये ऊसतोड मजुरांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतात अहोरात्र मेहनत घेऊन ऊसतोडीचे काम करणाऱ्या मजुरांच्या कष्टांमुळेच साखर उद्योगाची चाके गतिमान राहतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या कोपीवर आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ऊसतोड मजूर हे आमचे सहकारी असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आमची भूमिका आहे. सहकार मंत्री म्हणून कार्यरत असताना ऊसतोड मजुरांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. त्याचा लाभ आज मजूर बांधवांना मिळत आहे.ऊसतोड मजूर व त्यांच्या बैलांसाठी अपघाती विमा संरक्षण, मजुरांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी, शुद्ध फिल्टर पाण्याची सुविधा, जनावरांचे लसीकरण तसेच साखर शाळांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून ऊसतोड मजुरांशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे आणि ऋणानुबंधाचे नाते दरवर्षी दिवाळीच्या माध्यमातून अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, संगीता पोळ, निवृत्ती शिंदे, कल्पना शिंदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड यांनी केले, तर उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here