रायपूर : ई-२० पेट्रोलमुळे कारचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने कार उत्पादक कंपनी आणि तिच्या अधिकृत डिलरला जबाबदार धरले आहे. ग्राहकाला नवी कार द्यावी किंवा थेट २० लाख रुपये परत करावेत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. ई-२० पेट्रोलमुळे वाहनाचे नुकसान झाल्याप्रकरणी भरपाई देण्याबाबत देशातील हा पहिलाच निकाल आहे. संबंधिक कार मालक प्रेमराज देवता यांनी ई-२० पेट्रोलमुळे त्यांच्या कारचे नुकसान झाल्याची ऑनलाइन तक्रार १२ मार्च २०२५ रोजी रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे दाखल केली होती. ई-२० पेट्रोल वापरल्यानंतर आपल्या कारमध्ये वारंवार समस्या येऊ लागल्या, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. डीलरशिपने तपासणीनंतर ही भेसळयुक्त पेट्रोलची समस्या असल्याचे सांगत इंधन टाकी रिकामी केली. यात पेट्रोलमध्ये खाली वेगळ्या प्रकारचा पांढरा पदार्थ जमा झालेला आढळला होता.
डॉ. प्रेमराज यांनी जूनमध्ये कार खरेदी केली होती. खरेदीच्या वेळी डीलरने सांगितले होते की, कार डिसेंबर २०२३ मध्ये तयार झाली आहे, परंतु नंतर आयोगाच्या नोंदीनुसार कार जानेवारी २०२३ मध्ये तयार झाली असल्याचे समोर आले. त्रस्त वाहनधारक प्रेमराज यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. आपण दाखल केलेल्या तक्रारींमध्ये प्रेमराज यांनी आपल्या वाहनाच्या इंजिनमधील समस्या, खराब कामगिरी ही इथेनॉल मुळे असल्याचे म्हटले होते. यावर सुनावणीदरम्यान पेट्रोलच्या नमुन्यांची तपासणी एसजीएस प्रयोगशाळेत करण्यात आली. अहवालात इंधनात इथेनॉलच्या उपस्थितीची पुष्टी झाली. तपासणीत असे आढळून आले की, पेट्रोलच्या खालच्या भागात इथेनॉल पांढऱ्या थराच्य रूपात वेगळे होऊन जमा झाले होते. आयोगाने संबंधितांनी ग्राहकाच्या मानसिक हानी आणि खटल्याच्या खर्चाची भरपाई द्यावी. आयोगाने ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासापोटी १ लाख रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी १०,००० रुपये देण्याचा आदेश दिला आहे. जर ही रक्कम ४५ दिवसांच्या आत भरली नाही, तर पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत ७ टक्के वार्षिक व्याज देखील द्यावे लागेल, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.


















