कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगर-जॅगरी प्रकल्पास कर्ज पुरवठ्यात नियमांचे उल्लंघन, आरबीआयकडून ‘केडीसीसी’ला दंड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) नियमांचे उल्लंघन करून जिल्हा बँकेच्या संचालकांच्या खासगी कंपनीला केलेल्या कर्ज पुरवठ्याला नाबार्डने आक्षेप घेतला होता. नाबार्डने केडीसीसी बँकेची मार्च २०२५ अखेर केलेल्या तपासणीमध्ये निदर्शनास ही बाब आली. नियमांचे पालन न झाल्याचे आढळून आल्याने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. बँकेच्या संचालकांना कर्ज वितरण केल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला होता. याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने १३ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर हा कर्ज पुरवठा घाटगे हे बँकेचे संचालक होण्यापूर्वी केला गेला असल्याचा दावा बँकेने केला आहे.

बँकेचे संचालक, माजी आमदार संजय घाटगे यांच्या केनवडे (ता. कागल) येथील अन्नपूर्णा शुगर अॅन्ड जॅगरी प्रा.लि. या खासगी प्रकल्पास केडीसीसी बँकेने कर्जपुरवठा केला होता. कंपनीचे अध्यक्ष संजय घाटगे यांची २०२३ मध्ये बँकेचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती झाली. बँकेच्या संचालकांना त्यांच्या खासगी कंपनीला कर्ज देता येत नाही. त्याचबरोबर, दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रक्कम रिझर्व्ह बँकेला परत न केल्याबद्दल दंड केल्याचे रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक बृज राज यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर, दहा वर्षे बंद असलेल्या खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करायची असते, पण ती वेळेत केली नसल्याबद्दलही कारवाई केली आहे. दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी ज्यावेळी ‘अन्नपूर्णा’ कंपनीला कर्ज दिले, त्यावेळी संजय घाटगे बँकेचे संचालक नव्हते. ते संचालक झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे असे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here