पुणे : शेतकऱ्यांचा सेंद्रीय खते वापराकडे कल, भीमानदी पट्टयात क्षारपड जमिनी पुन्हा होणार सुपीक

पुणे: दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, शिरापूर, हिंगणीबेर्डी, मलठण आदी गावांमधील मोठ्या क्षेत्रावर क्षारपड जमिनीचे संकट निर्माण झाले आहे. अनेक वर्षे झालेल्या अतिसिंचनामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढले असून, पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक शेतीक्षेत्रांची उत्पादकता घटली आहे. काही ठिकाणी जमीन लागवडीसाठीही अयोग्य ठरली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना शेतकरीही स्वतःहून पुढाकार घेत आहेत. दौंड तालुक्यासह भीमानदी पट्टयातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. रासायनिक खतांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, त्यांच्या अतिवापरामुळे ढासळणारे जमिनीचे आरोग्य आणि शेतमालाच्या गुणवत्तेबाबत वाढलेली चिंता हेसुद्धा याला कारणीभूत ठरले आहे.

शेतकऱ्यांकडून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, कोंबडी खत, गांडूळखत, लेंडी खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर वाढला असून, पीक फेरपालट, हिरवळीची खते आणि आधुनिक जलव्यवस्थापन पद्धतींचाही स्वीकार होत आहे. जमिनीत मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खते मिसळणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी समांतर चर (ड्रेनेज) खोदणे, हिरवळीची खते वापरणे आणि पीक फेरपालट करणे अशा उपाययोजनांमुळे क्षारपड जमिनी पुन्हा लागवडीयोग्य होत असल्याचा अनुभव अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शेणखत सुमारे ५ हजार प्रति ट्रेलर या दराने मिळत आहे. तर कोंबडी खत सुमारे १६० रुपये प्रति बॅग या दराने मिळते. गांडूळखत ८ हजार रुपये प्रति टन दराने उपलब्ध आहे. कमी खर्च, जमिनीचे आरोग्य सुधारण्याची क्षमता आणि दर्जेदार उत्पादन या त्रिसूत्रीमुळे शेतकरी आता रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here