धाराशिव : बाणगंगा कारखान्याकडील थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

धाराशिव : बाणगंगा साखर कारखान्याला ऊस पुरवून अनेक महिने उलटून गेले असले तरी अद्याप बँक खात्यावर ऊस बिलांची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांची ऊस बिले तर सुमारे वर्षभरापासून प्रलंबित आहेत. थकीत ऊस बिले मिळाली नसल्याचा आरोप करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारपासून साखर कारखाना परिसरात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शेतकरी प्रतिनिधी गणेश अंधारे महाराज उपोषण करीत असून काही शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होत आहेत. भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

ऊस बिले थकल्याने आंदोलनात उतरलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, या मागणीसाठी कारखाना प्रशासनाला आणि राज्याच्या साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, यापूर्वी २ जुलै रोजी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. त्यावेळी कारखाना प्रशासनाने २० जुलैपूर्वी सर्व थकीत ऊसबिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. शेतीसाठी आवश्यक भांडवल, कर्जाचे हप्ते, खत-बियाणे, मजुरी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने ऊस बिले देण्याची कार्यवाही केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here