कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ हे अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या कारभारात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नियमबाह्य कर्जे देण्यात आल्याचा आरोप भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेच्या कारभाराशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मंत्री हसन मुश्रीफ हे मोठे नेते असल्याने त्यांच्यावर केवळ आरोप करण्याचा माझा हेतू नाही. योग्य वेळ आल्यावर संबंधित कागदपत्रे सादर करू. या संपूर्ण कारभारावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुश्रीफ यांनी कितीही आक्रमकपणे आपली बाजू मांडली तरी त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत फरक असल्याचा आरोप पाटील यांनी केला. जिल्हा बँकेला यापूर्वी दोन लाख रुपये आणि आता 13 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी आता तरी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे ते म्हणाले. हसन मुश्रीफ हे केवळ कागलपुरतेच मंत्री राहिले असल्याची टीका शिवाजीराव पाटील यांनी केली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला हवा. चंदगडसाठी एखादा दवाखाना किंवा मोठे रुग्णालय तरी दिले का, असा सवाल करत यामुळे आमची नाराजी असल्याचे पाटील यांनी सांगितले.


















