अहिल्यानगर : साखर कारखानदारीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. कारखाने स्वयंचलित झाले आहेत. तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे कामाची पद्धत बदलली आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, कारखान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी साखर कामगारांनी काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित साखर कामगार कार्यपद्धती मार्गदर्शन शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कामगार हा शेतकरी आणि साखर उत्पादक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कामगारांच्या अडचणी व्यवस्थापन मंडळाने वेळेवर समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव आणि कामगारांच्या श्रमाला योग्य मोबदला देऊन त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम या उद्योगातून होते. शेतकरी आणि कामगार हे या साखर उद्योग रथाची दोन महत्त्वाची चाके आहेत. यातील एकाही चाकात बिघाड झाला तर हा उद्योगरूपी रथ पुढे चालू शकत नाही. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मोठी मदत होत आहे. कारखान्यांवर हजारो कामगारांच्या संसार प्रपंच अवलंबून आहे. कामगार घेत असलेल्या परिश्रमाचा त्यांना योग्य मोबदला देणे ही कारखान्याची पहिली जबाबदारी आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, छत्रपती सहकारी साखर कारखाना, इंदापूरचे व्हा. चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय निमसे, अशोकराव पवार आदींसह कामगार मंडळाचे पदाधिकारी, साखर कामगार आदी उपस्थित होते.


















