कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या घाऊक आणि किरकोळ दरात मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या साठ्याच्या प्रत्यक्ष पडताळणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील साखर कारखान्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कारखान्यांमधील प्रत्यक्ष साखर साठा, विक्री, मालाची आवक-जावक आणि नोंदींची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सणांपूर्वी मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि साठेबाजीला आळा बसावा, यासाठी सरकारने ही कारवाई सुरू केली आहे.
वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साखर व्यापारी, घाऊक विक्रेते आणि इतर साठाधारकांवरही मर्यादा घातली आहे. नियमित साठा जाहीर करणे बंधनकारक केले आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने सर्व साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत आदेश पत्र पाठविले आहे. जून २०२६ अखेर पी-२ साखर साठा अहवाल हा तपासणीचा आधार मानला जाणार आहे. जुलै महिन्यात झालेली विक्री आणि कारखान्यातून बाहेर गेलेला साखरेचा साठा विचारात घेऊन १ ते १४ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी केली जाणार आहे. तपासणीसाठी केंद्र सरकारच्या साखर व वनस्पती तेल संचालनालयातील अधिकारी, तसेच राज्य शासनाच्या साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची संयुक्त पथके नियुक्त केली आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेता २३ साखर कारखान्यांकडे ५,३६,०९३.५० मेट्रिक टन तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांकडे २,८७,६५९.२० मेट्रिक टन साखर ३० जूनपर्यंत शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.


















