पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीहक्काच्या जागेतील व्यावसायिक गाळे व निवासी घरांच्या मार्गातील पत्रे अथवा इतर अडथळे दूर करावेत, असा अंतरिम आदेश बारामती न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचे कारखान्याकडून पालन न झाल्यास व्यावसायिकांना आवश्यक कार्यवाहीचे स्वातंत्र्य राहील. अशा परिस्थितीत आवश्यक असल्यास वडगाव निंबाळकर पोलिसांनी मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही सूचना न्यायालयाने केली. पूर्वीप्रमाणे निर्बंधविरहित ये-जा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. व्यावसायिक प्रतिनिधी नितीन कुलकर्णी यांनी न्यायालयाने व्यावसायिकांना दिलासा दिला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.
कारखान्याने ऊस वाहतूक सुरळीत व्हावी, गव्हाण विस्तारीकरण करावे यासाठी मालकी हक्काच्या जागेत गेल्या तीन ते चार दशकांपासून असलेले गाळे पाडून दुसरीकडे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला काही गाळेधारकांनी संमती दिली. मात्र काही गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. यांदरम्यान, कारखान्याने रस्त्याकडेला, दुकान लाइनसमोर पत्रे ठोकले. याबाबत महेश सत्तेगिरी व इतरांनी बारामती न्यायालयात कार्यकारी संचालकांसह इतरांविरोधात मनाईचा दावा दाखल केला. यावर अंतिम निकाल येईपर्यंत न्यायालयाने तूर्तास अंतरिम आदेश दिला आहे.
घरांकडे व गाळ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर उभारलेले पत्रे अथवा इतर अडथळे दूर करून पूर्वीप्रमाणे ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा. तसेच अंतिम निकालापर्यंत कारखान्याचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांच्या हक्कात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा विद्यमान स्थितीत बदल करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवावी यासाठी कारखान्याने तातडीने मंगळवारी (ता. ४) बारामती न्यायालयास अर्ज सादर केला असून, त्यावर युक्तिवादही झाला आहे. कारखान्याने याआधीच ऊस वाहतूक, शालेय विद्यार्थी वाहतूक समस्या आणि कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जागा मोकळी करून द्यावी, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.


















