सांगली : आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्यालाही नवसजीवनी मिळण्याची आशा

सांगली : राज्यात दीर्घकाळापासून बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारने हालचालींना वेग दिला आहे. राज्यातील बंद कारखान्यांची अद्ययावत माहिती, त्यांची आर्थिक स्थिती, मालकी हक्क, प्रलंबित कर्जे, न्यायालयीन वाद तसेच पुनरुजीवनासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल केंद्राने राज्य सरकारकडे मागवला आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा माणगंगा आणि कवठेमहांकाळचा महांकाली या बंद साखर कारखाने पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

राज्य सरकारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कारखान्याचा स्वतंत्र अभ्यास करून त्याच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. संबंधित कारखान्यांची आर्थिक क्षमता, उपलब्ध यंत्रसामग्री, ऊस उत्पादनाची स्थिती, कर्जाचा बोजा आणि कायदेशीर अडचणींचा विचार करून कारखाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गरजेनुसार आर्थिक मदत, पुनर्गुतवणूक, सार्वजनिक-खासगी भागीदारी अथवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारखाने पुन्हा सुरू करण्याचा पर्याय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी), अमूल, इफ्को यांसारख्या मोठ्या सहकारी संस्थांची मदत घेण्याचाही केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते. या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक पुनर्बाधणी, व्यवस्थापन आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आर्थिक संकट, वाढते कर्ज आणि निधीअभावी २०१७-१८ च्या हंगामापासून बंद आहे. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज असल्याने तो सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. कारखाना बंद असल्यामुळे परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी इतर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

माणगंगा कारखान्याची शेवटची निवडणूक ३१ मे २०२३ रोजी बिनविरोध झाली होती. तब्बल ३७ वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर झाले असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाने कारखान्याची सत्ता मिळवली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाने निवडणुकीत माघार घेतली होती.नवीन संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. हंगाम सुरू करण्याबाबत विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. मात्र बरीच वर्ष कारखाना बंद असल्याने मशिनरी वर होणारा वाढता खर्च व कामगार व्यवस्थापन यामुळे सुरु होवू शकला नाही.

केंद्र सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे माणगंगा आणि महांकाली कारखान्यांच्या पुनरुजीवनाची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. कारखाने सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार, वाहतूक व्यवसाय, ऊसतोड मजूर आणि इतर पूरक उद्योगांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठविल्या जाणाऱ्या अहवालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयाकडे सांगली जिल्ह्यातील शेतकरी व सभासदांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here