पुणे : साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून साखर कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, डिजिटल मॉनिटरिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यावर भर द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन (डीएसटीए) च्या ७१व्या वार्षिक अधिवेशन व साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत ते होते. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरियट येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री राजेश टोपे, दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, बी. बी. ठोंबरे, आर. व्ही. कुंभार, सोहन शिरगावकर, संभाजी कडू पाटील यांच्यासह साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या परिस्थितीत उद्योगाने आधुनिकतेकडे वाटचाल करावी
जयंत पाटील म्हणाले की, साखर उद्योगासमोर बाजारातील चढ-उतार, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि वाढती किंमत स्पर्धा ही मोठी आव्हाने आहेत. पूर्वी सहा महिने चालणारे अनेक कारखाने आता तीन ते चार महिन्यांच्या गाळप हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक क्षमता कमी होत असून, उद्योगाने ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींचा अभ्यास करून बदल स्वीकारणे आवश्यक आहे. त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये विकसित होणाऱ्या संशोधनाचा प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. साखर कारखान्यांनी केवळ साखरेपुरते मर्यादित न राहता इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी आणि इतर जैवआधारित उत्पादनांद्वारे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, असे त्यांनी सांगितले.
नव्या पिढीला उद्योगाशी जोडण्याची आवश्यकता
आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि ‘साखर टाळा’ या बदलत्या ग्राहक प्रवृत्तीचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले की, भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन आणि कार्यक्षमता या तीन बाबींवर उद्योगाने भर द्यावा. तसेच नव्या पिढीला साखर उद्योगाशी जोडून नवकल्पना आणि आधुनिकीकरणाला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे.
‘डीएसटीए’ची तांत्रिक प्रगतीतील भूमिका महत्त्वाची
डीएसटीएचे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये डीएसटीएची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योगासमोरील तांत्रिक आणि औद्योगिक आव्हानांवर चर्चा करून देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान उद्योगापर्यंत पोहोचविण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. साखर कारखाने, अभियंते, तज्ज्ञ आणि संशोधन संस्था यांच्यात समन्वय वाढवून उद्योग अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.
साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव
अधिवेशनात साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. साखर उद्योग गौरव पुरस्कार एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, माजी मंत्री व समर्थ साखर समूहाचे प्रमुख राजेश टोपे, गुजरात साखर संघाचे मानसिंहभाई पटेल, कृष्णा समूहाचे प्रमुख डॉ. सुरेशबाबा भोसले आणि कर्नाटकचे आमदार, माजी मंत्री व अथणी शुगरचे चेअरमन श्रीमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना यांना देण्यात आला.
इंडस्ट्रीयल एक्सलन्स अवॉर्ड मेरू इंडस्ट्रीजचे शरद गोरे, कॅन बायोसिसच्या संदीपा कानिटकर, केमिकल सिस्टीमचे अनुप केसरवाणी, टीकेआयएल इंडस्ट्रीज आणि स्वजित इंजिनिअरिंगचे अजित चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. टेक्निकल एक्सलन्स अवॉर्ड सुबोध जोशी, प्रमोदकुमार बेलसरे आणि श्रीपाद गंगावती यांना देण्यात आला. ज्येष्ठ सदस्य (९० वर्षावरील वय असलेले सदस्य) पुरस्कार यशवंत घारपुरे, मानसिंगराव जाधव आणि पी. एन. राव यांना प्रदान करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्काराने बालाजी पाबशेटवार, डॉ. स्वेन, रमेश गंगाई, आर. एस. कुलकर्णी आणि आर. बी. माने यांचा गौरव करण्यात आला. डीएसटीए एक्सेप्शनल सर्विस अवॉर्ड एम. आर. कुलकर्णी, एस. बी. देव, जगदीश कुलकर्णी, डॉ. सुरेश एम. पवार आणि एस. डी. बोरुडे यांना देण्यात आला. बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड एस. एस. हेगाना, राजेंद्र भिलारे, नारायण मेहाना, डॉ. एम. बी. लोंढे, टी. एम. कर्णे आणि आर. बी. पाटील यांना प्रदान करण्यात आला.


















