टायफून ‘डॉल्फिन’चा चीनला तडाखा; मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर

बीजिंग: शक्तिशाली ‘डॉल्फिन’ टायफून चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडकताच मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला असून, प्रशासनाने लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम हाती घेतली आहे. सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, पूर्व किनारपट्टीवरील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्थलांतराची कारवाई सुरू आहे.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत फुजियान प्रांतातील सुमारे १.६८ लाख नागरिकांना समुद्रकिनारी आणि इतर धोकादायक भागांतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर रविवारी उशिरापर्यंत शांघायमध्ये सुमारे २.१६ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.‘डॉल्फिन’ हा यावर्षीचा १३ वा टायफून असून, चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राच्या (NMC) माहितीनुसार त्याने रविवारी झेजियांग प्रांतात दोन वेळा किनारपट्टी गाठली.

ChiniMandi WhatsApp Channel

टायफूनची तीव्रता कमी होऊन तो आता उष्णकटिबंधीय वादळात (ट्रॉपिकल स्टॉर्म) परिवर्तित झाला असला, तरी बुधवारपर्यंत अतिवृष्टी, गंभीर पूरस्थिती आणि भूस्खलनाचा धोका कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने सोमवारी सकाळी ब्लू टायफून अलर्ट जारी करत झेजियांग, जियांगसू, हेनान आणि हेबेईसह अनेक प्रांतांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चीनच्या सरकारी प्रसारक सीसीटीव्हीच्या माहितीनुसार, ‘डॉल्फिन’ने चीनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुमारे ६,००० किलोमीटरचा प्रवास केला असून, त्याचा कालावधी सामान्य टायफूनच्या तुलनेत तीनपट अधिक राहिला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारपासून या टायफूनचे अवशेष उत्तरेकडे सरकतील आणि थंड हवेच्या प्रभावामुळे बीजिंग, तियानजिन, हेबेई आणि लियाओनिंग या भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी अनेक भागांत पूर, भूस्खलन तसेच लहान आणि मध्यम नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बीजिंग प्रशासनाने मंगळवार सकाळपासून पूरस्थितीवरील लेव्हल-२ आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.चीनमध्ये धडक देण्यापूर्वी ‘डॉल्फिन’ने फिलिपिन्स, उत्तर तैवान आणि जपानमधील ओकिनावा बेटावरही मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह मोठा प्रभाव टाकला होता.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here