मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तब्बल 17 हजार 473 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात विविध बियाणे कंपन्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 85 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सरकारी मालकीच्या महाबीज कंपनीच्या बियाण्यांबाबतही सुमारे एक हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून तपासणीदरम्यान 50 हून अधिक नमुने निकृष्ट किंवा अप्रमाणित आढळल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारींची संख्या वाढल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांनी संबंधित शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. एकूण 10 हजार 113 प्रकरणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 7 हजार 811 नमुने प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीनंतर 1 हजार 82 नमुने अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले आहे.या अहवालाच्या आधारे विविध खासगी बियाणे कंपन्यांविरोधात 85 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 कंपन्यांविरोधात 79 गुन्हे, तर इतर कंपन्यांविरोधात 6 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
दरम्यान, महाबीजच्या बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि अप्रमाणित नमुने आढळूनही कंपनीविरोधात अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी सचिव अध्यक्ष असलेल्या या सरकारी कंपनीला शासनाकडून संरक्षण दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी सरकारी असो वा खासगी, तिच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी संघटनांनी मात्र निकृष्ट बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबरोबरच दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


















