मुंबई : ‘एनसीडीसी’कडून राज्य सरकारच्या थकहमीवर आर्थिकदृष्ट्या आजारी सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिले जाते. हे कर्ज देताना त्याच्या विनियोगासंदर्भात नियम आणि अटी निश्चित केल्या जातात. मात्र, काही कारखान्यांनी अटींचे उल्लंघन केल्याचे ‘एनसीडीसी’च्या तपासणीत समोर आले होते. ‘एनसीडीसी’ने १२ जून ते १७ जुलै २०२५ या कालावधीत राज्यातील ३० सहकारी साखर कारखान्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये २१ कारखान्यांनी कर्जाच्या वापरात गंभीर उल्लंघने केल्याचे आढळले. तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघने केली, तर सहा कारखान्यांनी नियमानुसार कर्जाचा विनियोग केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीने सात महिन्यानंतरही अहवाल दिलेला नाही. त्यामुळे साखर कारखाान्यांवरील कारवाई रखडली आहे.
आर्थिकदृष्ट्या आजारी कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून दिलेल्या कर्जाच्या विनियोगात अटी-शर्तीचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमली गेली होती. मात्र अहवाल सादर न झाल्याने कारखान्यांवरील कारवाई रखडली. अखेर सहकार आयुक्तांचा समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही पुनर्गठित समिती दोन आठवड्यांत अहवाल देणार आहे. ‘एनसीडीसी’च्या तपासणीत कर्जाच्या वापरात उल्लंघन आढळलेल्या कारखान्यांविरुद्ध कोणती कारवाई करावी, याबाबत शिफारशी करण्याची जबाबदारीही समितीकडे होती. मात्र, सात महिन्यांनंतरही समितीने अहवाल किंवा कारवाईबाबत शिफारशी सादर केल्या नाहीत. त्यामुळे संबंधित कारखान्यांविरुद्ध पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया रखडली आहे. यापूर्वीच्या समितीत प्रादेशिक साखर सहसंचालक आणि साखर आयुक्त कार्यालयातील अर्थ विभागाच्या संचालकांचा समावेश होता. समितीने दोन आठवड्यांत म्हणजे २४ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. आता सहकार विभागाने समितीचे पुनर्गठन करून सहकार आयुक्तांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे.


















