मुंबई: 7 ऑगस्ट 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Forex Reserves) 14.14 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 707 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली. आरबीआयच्या बुलेटिन आणि साप्ताहिक सांख्यिकी परिशिष्टानुसार, या आठवड्यातील मोठी वाढ मुख्यतः परकीय चलन मालमत्ता आणि सोन्याच्या साठ्यात झालेल्या वाढीमुळे झाली आहे.
देशाच्या परकीय चलनसाठ्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत 9.95 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ती 574.63 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.त्याचप्रमाणे सोन्याच्या साठ्यातही 4.00 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली असून तो 108.74 अब्ज डॉलर झाला आहे. याशिवाय, भारताचे विशेष आहरण हक्क (Special Drawing Rights – SDRs) 0.08 अब्ज डॉलरने वाढून 18.75 अब्ज डॉलर झाले, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताची राखीव स्थिती (Reserve Position) 0.12 अब्ज डॉलरने वाढून 4.89 अब्ज डॉलर झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, मार्च 2026 अखेरच्या तुलनेत भारताचा एकूण परकीय चलनसाठा 15.89 अब्ज डॉलरने अधिक आहे.मार्चअखेरपासून परकीय चलन मालमत्तेत 22.34 अब्ज डॉलरची वाढ होऊन ती 574.63 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र, ताज्या आठवड्यात मोठी वाढ झाल्यानंतरही आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य मार्चअखेरच्या तुलनेत 6.66 अब्ज डॉलरने कमी आहे.
वार्षिक आधारावर (Year-on-Year) भारताचा एकूण परकीय चलनसाठा 13.38 अब्ज डॉलरने वाढला आहे.मात्र, या वार्षिक वाढीची रचना वेगळी दिसून आली. परकीय चलन मालमत्ता वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 9.35 अब्ज डॉलरने कमी झाली, तर सोन्याच्या साठ्याचे मूल्य 22.58 अब्ज डॉलरने वाढले.त्यामुळे सोन्याच्या साठ्यातील वाढीने परकीय चलन मालमत्तेतील वार्षिक घट भरून काढली आणि देशाचा एकूण परकीय चलनसाठा गेल्या वर्षीच्या पातळीपेक्षा अधिक राहिला.


















