अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर झाली. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्याला १४४ कोटी रुपयांचे अल्पमुदतीचे कर्ज मिळाले होते. त्यातून बँकेने ११८ कोटींची थकबाकी व इतर कपात केल्यानंतर २५ कोटी १८ लाख रुपये उपलब्ध झाले. त्यातून शेतकऱ्यांची देणी देण्यात आली आहेत. आता २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अध्यक्ष गायकर यांनी दिली. तर कारखान्याचे कर्ज किती वाढले आणि तोटा कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले याची मााहिती संचालक मंडळाने वार्षिक अहवालात द्यावी, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
आमदार लहामटे म्हणाले की, २०२२ च्या निवडणुकीवेळी सभासदांना कारखान्याचा दरवर्षी होणारा तोटा कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. संचालक मंडळाने आपल्या कार्यकाळात कारखान्याचे कर्ज किती वाढले आणि तोटा कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले, याची माहिती वार्षिक अहवालाच्या माध्यमातून मांडावी. कारखाना ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे. कारखान्यावरच अकोल्याची बाजारपेठ अवलंबून असून, शेतकरी आणि कामगारांचे संसार त्यावर चालतात. त्यामुळे ही भाग्यलक्ष्मी टिकविण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे. तालुक्यात उसाचे उत्पादन कसे वाढेल, याकडे कारखाना प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. यावेळी उपाध्यक्ष सुनीता भांगरे, माजी आमदार वैभव पिचड, बी. जे. देशमुख, जालिंदर वाकचौरे, उत्कर्षा रूपवते, विजय वाकचौरे, राजेंद्र कुमकर, शरद चौधरी, प्रमोद मंडलिक, अक्षय आभाळे यांच्यासह कार्यकारी संचालक सुधीर कपडणीस आदी उपस्थित होते.


















