केंद्र सरकारचा विक्रमी साखर दरांवर नियंत्रणासाठी मर्यादित शुल्कमुक्त साखर आयातीचा विचार सुरु : रिपोर्ट

मुंबई/नवी दिल्ली : ‘रॉयटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवून विक्रमी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार मर्यादित प्रमाणात शुल्कमुक्त साखर आयात करण्यासह अनेक उपाययोजनांवर विचार करत आहे. सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. प्रस्तावित उपायांमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांसाठी साखर साठवणुकीची मर्यादा कमी करणे, मर्यादित आयातीला परवानगी देणे, आयात शुल्कात कपात करणे तसेच देशांतर्गत विक्रीसाठी साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक साखर कोट्यात बदल करणे यांचा समावेश आहे.

जवळपास दशकभरानंतर भारताने साखर आयात केल्यास त्याचा जागतिक साखर बाजारावरही परिणाम होऊ शकतो, तर देशांतर्गत बाजारात आगामी सणासुदीच्या काळात वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, साखरेच्या दरात अपेक्षेपेक्षा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार विविध उपाय आणि पर्यायांचा विचार करत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साखर व्यापार केंद्र असलेल्या कोल्हापूरमध्ये साखरेचे घाऊक दर ऑगस्टच्या सुरुवातीपासून जवळपास २० टक्क्यांनी वाढून विक्रमी ५,३५० रुपये प्रति १०० किलो झाले आहेत. म्हणजेच कोल्हापूरमध्ये साखरेचा घाऊक दर सुमारे ५३.५० रुपये प्रति किलो झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

देशांतर्गत पुरवठा वाढवण्यावर भर

दुसऱ्या सरकारी सूत्राने सांगितले की, पुढील साखर हंगामातील नवीन साखर बाजारात येईपर्यंत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साखर साठा उपलब्ध आहे. मात्र, स्थानिक बाजारात पुरवठा तुलनेने कमी पडत आहे. बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी : ‘रॉयटर्स’शी बोलताना सांगितले की, स्थानिक बाजारातील साखरेचा पुरवठा मर्यादित आहे. सणासुदीच्या काळात पुरवठा वाढवून दर कमी करण्यासाठी साखर आयात हाच प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले.

सणासुदीमुळे साखरेच्या मागणीत वाढ

भारतात साधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात साखरेची मागणी वाढते. या कालावधीत गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी यांसारखे प्रमुख सण येतात.सणांच्या काळात मिठाई आणि कन्फेक्शनरी उत्पादनांचा खप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे साखरेची मागणीही वाढते. यंदा आधीच साखरेचे दर विक्रमी पातळीवर असल्याने सणासुदीच्या अतिरिक्त मागणीमुळे बाजारावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उसाचे प्रमाण कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.यामागील उद्देश अधिक ऊस साखर उत्पादनासाठी उपलब्ध करून देणे आणि विक्रमी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर नियंत्रणात आणणे हा आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here