नवी दिल्ली : देशात साखरेची किंमत प्रतिकिलो ४५ रुपयांवरून ७० ते ७५ रुपये झाली असून जनतेची उघडपणे लूट करण्यासाठी मोदी सरकारने लगावलेला हा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे. लोकांना मधुमेहापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साखर महाग करून पेट्रोलमध्ये टाकल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. देशात सणासुदीच्या मोसमात साखरेची टंचाई निर्माण होणार असल्याची पूर्वकल्पना चार महिने आधीच सरकारला होती. तरीही मोदी सरकारने नफेखोर, काळाबाजार करणाऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यातून ३६ हजार कोटी रुपयांचा झाला, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. २०२५-२६ मध्ये भारतात साखरेचे उत्पादन ३४३ लाख टन होईल, असा दावा मोदी सरकारने केला होता. पण प्रत्यक्षात ते २७५ लाख टन झाल्याचे ३० एप्रिल २०२६ रोजी इंडियन शुगर मिल असोसिएशनने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. यातून आधीच्या वर्षाच्या तुलनेत ३० लाख टन साखर कमी उत्पादित झाल्याचे स्पष्ट होते असे त्यांनी सांगितले.
सुरजेवाला म्हणाले की, ज्यांच्यापाशी साखरेचा साठा आहे, त्यांना काहीही न करता किलोमागे ३० रुपयांचा फायदा होणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान १२० लाख टन साखरेची विक्री होणार असल्यामुळे देशातील जनतेला किलोमागे ३० रुपये जास्तीच्या दराने ३६ हजार कोटी रुपये मोजावे लागणार आहेत, देशभरातील साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत ई-२० इंधनासाठी ३२ टक्के ऊस वापरला. या उसापासून इथेनॉल उत्पादन करण्यात आले. हा ऊस साखरेच्या उत्पादनासाठी वापरला असता तर आज साखरेचे भाव वाढले नसते. २० ऑगस्ट रोजी ब्राझीलमधून १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. ही साखर सागरी मार्गाने भारतात येण्यास ४५ ते ५५ दिवस लागणार असून त्यावर प्रक्रिया करण्यास आणखी १५ दिवस लागतील. तोपर्यंत ऑक्टोबर महिना संपलेला असेल. ही साखर सणांच्या मोसमात उपलब्ध होणार नाही, एप्रिलनंतर चार महिन्यांमध्ये १२० लाख टन साखरेची आवश्यकता भासणार आहे हे माहिती असूनही मोदी सरकारने एप्रिलपासून कोणतीही पावले उचलली नाहीत, असे सुरजेवाला म्हणाले.

















