पुणे : केंद्र सरकारने साखरेची दरपातळी सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी आणखी पावले उचलली असून, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टनांचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने प्रथमच रविवार असूनही सुट्टीच्या दिवशी साखरेचा कोटा खुला केला. यावरून केंद्र सरकार साखरेच्या दरपातळीवर करडी नजर ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे.मागील आठवड्यात घाऊक बाजारातस एस ३० ग्रेड साखरेचे दर घटून क्विंटलला ५५०० रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. तर कारखान्यांवरील साखर निविदाही ४८०० ते ५००० रुपयांपर्यंत खाली आल्याचे चित्र आहे. सर्वजण सप्टेंबर महिन्यासाठी केंद्र सरकार किती कोटा जाहीर होणार, याकडे डोळे लावून बसले होते.
सप्टेंबर २०२६ पासून साखर विक्रीचे नियम पूर्णपणे बदलत आहेत. संपूर्ण महिन्याऐवजी आता पहिले १५ दिवस व नंतर १६ ते ३० तारीख असे १५ दिवस असा दोन टप्प्यात स्वतंत्र साखर कोटा घोषित होईल. पहिल्या पंधरवड्यात घोषित कोट्यातील ४० टक्के मालाची कारखान्यांना पहिल्या सात दिवसांत विक्री करावी लागेल. कारखान्यांनी ज्या दिवशी साखर विकली, त्या दिवसांपासून सात दिवसाच्या आत ती साखर कारखान्याच्या गेटबाहेर म्हणजे बाजारपेठेत व्रिकीस उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्याद्वारे मुबलक पुरवठा होऊन दरपातळी नियंत्रणात येण्यास मदत होईल.


















