सांगली: विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्रेसमड व सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रतिदिनी दहा टन कॉग्रेस्ड बायोगॅस (सी. बी. जी.) निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली येथील कार्यस्थळावर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते. केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये प्रतिकिलो केल्याशिवाय आणि इथेनॉल, स्पिरीट आदी उपपदार्थांचे दर स्थिर ठेवल्याशिवाय साखर उद्योगाची अडचणीतून सुटका होणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी साखरेच्या विक्री दरात वाढ करून इथेनॉल, स्पिरिट आदी उपपदार्थांच्या किमती स्थिर ठेवल्या पाहिजेत. गेल्यावर्षी आमचा कारखाना केवळ शंभर दिवस चालला. सर्वच कारखाने आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा कर्जफेडीची शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. साखरेच्या दरात स्थिरता नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत आहे. दरवाढीबाबत साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जाऊन केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र चार महिने झाले तरी निर्णय झालेला नाही. कारखान्याने तब्बल ५ लाख ५० हजार क्विंटल साखर जुन्या दराने विकली. त्यानंतर साखरेच्या किमतीत झपाटयाने वाढ झाली. मात्र ही दरवाढ अस्थिर ठरली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन केले.


















