सांगली : महांकाली सहकाारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहा सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संभाव्य मतदान केंद्रांच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. संभाव्य मतदान केंद्रांसाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी येथील शाळांची पाहणी केली. यावेळी मिरज प्रांताधिकारी विशाल यादव, तहसीलदार अर्चना कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी उल्हास भांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी गतिमान केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी शहरातील काही शाळांना भेट देऊन त्यांनी मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, वीज व्यवस्था, उपलब्ध जागा यासह विविध सुविधांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांच्या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन नियोजन करीत असल्याचे सांगण्यात आले.


















