पुणे : आगामी ऊस गळीत हंगामात ऊस तोडणी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने साखर आयुक्तालयाने सर्व साखर कारखान्यांना खबरदारीचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागातील उसाच्या फडांमध्ये बिबट्यांचा अधिवास असल्याने तोडणी कामगार, शेतकऱ्यांना धोका निर्माण होतो हे लक्षात घेऊन ऊस तोडणी कामगारांच्या वस्त्या रक्षित जागी उभारण्याची दक्षता घ्या, अशा सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत. आयुक्तालयाने राज्यातील सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून बिबट्याची समस्या गांभीर्याने हाताळण्याचे आवाहन केले आहे. बिबट्यांना लपण्यासाठी ऊस पिक हे सुरक्षित ठिकाण झाले आहे. मात्र, ऊस तोडणी झाल्यावर बिबट्याची कमी वयाची पिले मोकळ्या शेतात सापडतात. यातून मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण होते, असे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सध्या राज्यातील सर्वांत जास्त बिबट्यांची संख्या पुण्याच्या जुन्नर वन विभागात आहे. या भागातील ऊस लागवडीमुळे बिबट्यांच्या पिढ्या उसात तयार होत आहेत. उसाचे मळे हे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास नाहीत. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आणि सिंचनाची सोय झाली. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात देखील ऊस लागवड वाढली. लागवडीनंतर पुढील तीन महिने ऊस शेतीत माणसांचा वावर नसतो; पण तेथे पाण्याची उपलब्धता असते. त्यामुळे साखर कारखान्यांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऊस तोड कामगारांमध्ये जनजागृती करावी. त्यामुळे मनुष्य हानी टाळणे शक्य होईल असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले. कामगारांच्या राहण्याच्या व्यवस्था शेतीऐवजी सुरक्षित ठिकाणी कराव्यात, कारखाना व्यवस्थापनाने वन विभागाच्या मदतीने कामगारांना बिबट्यांबाबत माहिती द्यावी, कामगार वस्ती शेतातच असेल तर चारही बाजूला तात्पुरते कुंपण उभारावे, वस्तीभोवती सौर कुंपण किंवा विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी, मुलांसाठी देखरेख, संगोपन, शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बंदिस्त शौचालयाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


















