पुणे : सोमेश्वरच्या निवडणुकीत एकीचे कार्ड; सुनेत्रा पवारांकडून सर्वसमावेशक पॅनेलची चाचपणी

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारखान्याच्या हितासाठी पक्ष, गट-तट आणि मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभासद व कार्यकर्त्यांच्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्यास बारामती, फलटण तसेच परिसरातील शेतकरी सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पक्ष, गट आणि तट बाजूला ठेवून सोमेश्वर कारखान्याच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. कारखान्याची प्रगती आणि शेतकरी सभासदांचे हित हेच आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.” गेल्या काही वर्षांत सोमेश्वर कारखान्याने सातत्याने प्रगती साधली असून, ही वाटचाल कायम ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी एकदिलाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत कोणतेही मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन सक्षम आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली जाईल, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

ChiniMandi WhatsApp Channel

मेळाव्यादरम्यान कार्यकर्ते आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कारखान्याशी संबंधित ज्येष्ठ कार्यकर्ते, विविध पदाधिकारी तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हजारो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीचा आधार असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी सर्वसमावेशक पॅनेल उभे करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, सुनेत्रा पवार यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here