पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदांच्या २१ जागांसाठी तब्बल ४३१ अर्ज आले आहेत. आज (ता. ११) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, अर्जाची संख्या सहाशेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘सोमेश्वर’च्या संचालकपदासाठी इच्छुकांची मांदियाळी निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ७ ते ११ सप्टेंबर अशी देण्यात आली होती. गुरुवारी पाचव्या दिवशी १५८ अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जाची संख्या ४३१ वर पोहोचली आहे.
कारखान्याच्या बहुतांश आजी-माजी संचालकांनीही पुन्हा अर्ज दाखल करत आपले नशीब अजमावले आहे. ‘राष्ट्रवादीकडून अर्जाची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही साठ-सत्तर अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनीही स्वतंत्र पॅनेल टाकण्याची घोषणा केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचीही अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही आज काही अर्ज दाखल केले. यामुळे नेमके किती पॅनेल होतात आणि सत्ताधारी राष्ट्रवादीला आव्हान मिळणार का याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.


















