पुणे : कारखान्यांकडून प्रतिकिलो सुमारे ४५ रुपयांनी खरेदी होणारी साखर किरकोळ बाजारात ६० रुपयांनी विकली जात आहे. साखरेच्या दरात झालेली ही कृत्रिम वाढ नेमकी कोणामुळे झाली, याची केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह साखर कारखान्यांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ऑगस्टच्या सुरुवातीला साखरेचा दर सुमारे ५० रुपये किलो होता. त्यानंतर १७ ऑगस्टपासून दर वाढत ७५ रुपयांपर्यंत पोहोचला. सध्या दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी किरकोळ बाजारात साखर अद्याप ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. देशातील साखर कारखान्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असलेला साखरेचा साठा तसेच जीएसटीशी संबंधित नोंदी केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची तपासणी करून दरवाढीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
१५ ऑक्टोबरपासून गाळपाबाबत निर्णयात बदलाची शक्यता
सण-उत्सवांच्या काळात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक भागांत गेल्या ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गाळप हंगाम सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यंदा साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता
पावसाच्या अनियमिततेचा आणि कमी-अधिक पर्जन्यमानाचा परिणाम यंदाच्या साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत साखरेची मागणी सुमारे २८० लाख मेट्रिक टन आहे. त्याशिवाय अतिरिक्त गरज लक्षात घेता देशाला एकूण सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेची आवश्यकता भासू शकते, असे पाटील यांनी सांगितले. दरवर्षी साखर कारखाने अपेक्षेपेक्षा लवकर बंद होत आहेत. यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने अनेक कारखाने नेहमीपेक्षा सुमारे २० दिवस आधी बंद होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.


















