कोल्हापूर : सहकार आधारित झीरो वेस्ट संकल्पनेवून शेती उत्पादनासाठी तब्बल ६०० कोटीची गुंतवणूक असलेला बहुराज्यीय प्रकल्प कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
हुपरी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात स्पेंट वॉश आणि प्रेसमडपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), तसेच सायट्रिक अॅसिड आणि पोटॅश निर्मिती करण्यात येणार आहे. देशातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला. साखर उद्योगासमोरील सध्याची आव्हाने लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या शाश्वत विकासासाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता उपउत्पादनांपासून उच्च मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा या प्रकल्पामागील उद्देश आहे.
जून महिन्यात इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी, तसेच जवाहर साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमात मंत्री शाह यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार तत्त्वावर आधारित मोठा प्रकल्प राबवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा प्रकल्प हुपरी येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला पूरक असा हा प्रकल्प आवाडे जवाहर कारखाना कार्यस्थळी होत असल्याचा आनंद असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
प्रकल्पात नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप. लि. (इफको), कृषक भारती को-ऑप. लि., नॅशनल को-ऑप. एक्स्पोर्टस् लि., नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, गुजरात को-ऑप. मिल्क मार्केटिंग तसेच इंडियन पोटॅश आदी सहकारी संस्थांची गुंतवणूक असणार आहे. पायाभरणी समारंभास केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेस इंडियन पोटॅशचे व्हा. प्रेसिडेंट नरेश शर्मा, केन अॅडव्हायझर डॉ. मल्लालीला, भानुजी, हर्ष मलिक, मार्केटिंग मॅनेजर सयाजी पाटील यांच्यासह जवाहर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेव कलागते, शेखर शहा, बाळासाहेब माने, मौश्मी आवाडे, सानिका आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, सपना भिसे, नरसिंह पारीक, सतीश मुळीक, महेश पाटील, शशिकांत मोहिते आदी उपस्थित होते.


















