सातारा : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज या संस्थेकडून उच्च साखर उतारा क्षेत्रातील तृतीय क्रमांकाचा ऊस विकास पुरस्कार सह्याद्रि कारखान्यास जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र कारखान्यास मिळाल्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, कारखान्याचे प्रेरक यशवंतराव चव्हाण आणि संस्थापक पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून, कारखान्यास हा पुरस्कार सन २०२४-२५ च्या गळीत हंगामातील कामगिरीसाठी देण्यात येणार आहे.
कारखान्याने सादर केलेल्या ऊस विकासाच्या आकडेवारीचे तज्ज्ञ समितीने मूल्यमापन करुन, या पुरस्कारासाठी निवड केली आहे. २०२४-२५ च्या हंगामात सह्याद्रि कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे पत्रात नमूद आहे. देश व राज्य पातळीवरील शासन व संस्थांमार्फत दिले जाणारे आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, उच्चतम तांत्रिक क्षमता पुरस्कार, ऊस विकास पुरस्कार, कारखाना परिसरातील वृक्षारोपणाबद्दल पर्यावरणपूरक कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार. असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये मंगळवारी (दि. २२) सकाळी ११.३० वाजता पुरस्काराचे वितरण सोहळा होणार आहे.


















