बेळगाव : हालसिद्धनाथ साखर कारखान्यावर कर्ज वाढले, असे काही जण सांगतात, मात्र त्यातून शेतकरी हितासाठी झालेली कामे सर्वांसमोर आहेत. उपपदार्थ वाढल्याने नुकसानीच्या प्रमाणात घट होत आहे. धान्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू केल्याने धान्याला चांगला भाव मिळत आहे. येत्या गळीत हंगामात कारखाना दररोज साडेदहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. इथेनॉलचे उत्पादन दीडवरून दोन लाख केएलपीडी क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ३८व्या वर्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी अण्णसाहेब जोल्ले म्हणाले की, कारखान्याकडून अन्य कारखान्यांपेक्षा दरवर्षी १० रुपये अधिक दर दिला जातो. कारखान्याने वेळेत बिल जमा करण्याची परंपरा जपली आहे. कामगार, सभासद विमा योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असे उपक्रम सुरू आहेत. कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकार्य लाभत आहे. आगामी काळात वाढत्या साखरेचे दर स्थिर राहिल्यास कारखाना व शेतकरी दोघांना लाभ होईल. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, अध्यक्ष जयकुमार खोत यांचेही भाषण झाले. संचालक श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. आप्पासाहेब शिरगावे यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान, येत्या रविवारी (ता. २०) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा एकसंबा येथील बिरेश्वर को-ऑप. सोसायटी इमारतीच्या उद्घाटनास येणार आहेत. कार्यक्रमास शहर परिसरातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जोल्ले यांनी केले.


















