मोलॅसिस खरेदी -विक्रीत फसवणूक प्रकरणी ‘गोकुळ शुगर’शी संबंधित तिघे चेन्नई पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : फसवणूक प्रकरणी धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरशी संबंधित तिघांना चेन्नई पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना कारमधून चेन्नईला नेले. गोकुळ शुगर कारखान्यात तयार होणारे बी-हेवी मोलॅसिस (मळी) आणि सी-मोलॅसिस चेन्नई येथील ईआयडी पॅरी इंडिया लिमिटेड कंपनीला पुरविण्याबाबत करार झाला होता. या व्यवहारापोटी कंपनीकडून कारखान्याने तब्बल १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, करारानुसार मोलॅसिसचा पुरवठा न केल्याने कंपनीची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोलॅसिस खरेदीसाठी झाला होता करार

ChiniMandi WhatsApp Channel

या प्रकरणी तामिळनाडूतील काचीपुरम, रामनगर येथील राजगोपाल श्रीनिवासन रामस्वामी (वय ५१) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गोकुळ शुगरमध्ये तयार होणारे बी-हेवी मोलॅसिस ११ हजार ५०० रुपये प्रति टन, तर सी-मोलॅसिस ९ हजार ५०० रुपये प्रति टन दराने खरेदी करण्याचा करार चेन्नईतील कंपनीसोबत करण्यात आला होता. मालवाहतूक करणारे आशिष पारेख यांच्या ओळखीच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

१५ कोटींहून अधिक रक्कम अॅडव्हान्स

करारानुसार १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत मोलॅसिसचा पुरवठा करण्याची हमी देण्यात आली होती. यासाठी ५०० रुपयांच्या बॉन्डवर वचन देण्यात आले होते. कंपनीने या व्यवहारासाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी ९ कोटी २० लाख रुपये, तर ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ६ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते.याशिवाय सुरक्षा ठेव म्हणून गोकुळ शुगरकडून सहकारी बँकेचे तीन धनादेश देण्यात आले होते. मात्र, करार झाल्यानंतरही मोलॅसिसचा अपेक्षित पुरवठा करण्यात आला नसल्याचा आरोप आहे.

वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद नाही

मोलॅसिसचा पुरवठा करण्यासाठी चेन्नईतील कंपनीने वारंवार फोनद्वारे संपर्क साधून मागणी केली. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर कारखान्याच्या वतीने सुधारित वचनपत्र देण्यात आले. मात्र, त्यानंतरही मालाचा पुरवठा झाला नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर कंपनीने पोलिसांत फिर्याद दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चेन्नई पोलिसांनी तपास सुरू करून गोकुळ शुगरशी संबंधित तिघांना ताब्यात घेतले.

चेन्नई क्राईम ब्रँचकडून कारवाई

“गोकुळ शुगरच्या तिघांना अटक केल्याची घटना खरी आहे. सोमवारी चेन्नई पोलिसांनी आमची मदत घेतली. रात्री उशिरा ते तिघांना चेन्नईला घेऊन गेले. ही कारवाई क्राईम ब्रँचकडून करण्यात आली,” अशी माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास चेन्नई पोलिसांकडून सुरू आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here