मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 11 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 4.92 अब्ज डॉलरने घटून 780.78 अब्ज डॉलरवर आला आहे. या घसरणीमागे प्रामुख्याने परकीय चलन मालमत्ता आणि सोन्याच्या साठ्यात झालेली घट कारणीभूत ठरली आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत आठवडाभरात 2.37 अब्ज डॉलरची घट झाली असून ती 645.80 अब्ज डॉलरवर आली आहे. याच कालावधीत भारताचा सोन्याचा साठा 2.59 अब्ज डॉलरने घटून 111.23 अब्ज डॉलरवर आला आहे. दरम्यान, विशेष आहरण हक्क (SDR) मध्ये 39 दशलक्ष डॉलरची वाढ झाली असून तो 18.85 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) भारताची राखीव स्थिती जवळपास स्थिर राहून 4.92 अब्ज डॉलर इतकी आहे.
मार्च 2026 च्या तुलनेत साठा 89.67 अब्ज डॉलरने अधिक
साप्ताहिक पातळीवर परकीय चलनसाठ्यात घट झाली असली तरी, मार्च 2026 च्या अखेरच्या तुलनेत भारताचा परकीय चलनसाठा 89.67 अब्ज डॉलरने अधिक आहे.आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2026 च्या अखेरच्या तुलनेत परकीय चलन मालमत्तेत 93.51 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मात्र, याच कालावधीत सोन्याच्या साठ्यात 4.17 अब्ज डॉलरची घट झाली आहे.या काळात SDR होल्डिंगमध्ये 223 दशलक्ष डॉलरची वाढ झाली, तर IMF मधील भारताच्या राखीव स्थितीत 108 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे.
वर्षभरात परकीय चलनसाठ्यात 77.82 अब्ज डॉलरची वाढ
वर्ष-दर-वर्ष आधारावर भारताच्या एकूण परकीय चलनसाठ्यात 77.82 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या कालावधीत परकीय चलन मालमत्तेत 58.78 अब्ज डॉलरची वाढ, तर सोन्याच्या साठ्यात 18.81 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ही आकडेवारी तात्पुरती (Provisional) आहे. आकडेवारीत काही फरक आढळल्यास तो राऊंडिंग ऑफमुळे असू शकतो.


















